दिल्लीतील राष्ट्रपती भवनात रविवारी (दि. ३ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटींमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडींची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. त्यांनी सप्टेंबर महिन्यात देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.
संजय राऊत म्हणाले, “राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच त्यांच्या सल्ल्याने सरकार किती चालते, हेही आपण जाणतो. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीतही भविष्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये मोठे काही घडणार, हे सातत्याने सांगितले जात आहे आणि आम्हालाही तसेच वाटते.”

“राष्ट्रपतींना भेटायला जाणे हीच मोठी बाब”
राऊत पुढे म्हणाले, “पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटतात हे त्यांच्या कामाचाच भाग आहे. मात्र, ते राष्ट्रपतींना बोलावत नाहीत तर स्वतः जाऊन भेटतात, हीच मुख्य बातमी आहे. देशात सध्या जी परिस्थिती आहे, त्यात काहीही होऊ शकते. काय घडते ते पाहुयात.”
गडकरींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गांधी-नेहरू यांच्या विचारांचा उल्लेख करत ‘रोजगारनिर्मिती’ला प्राधान्य दिल्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “सध्या सरकारमध्ये नितीन गडकरी हे सर्वात समजदार मंत्री आहेत. मात्र त्यांनी नेहरूंचं नाव घेतलं, म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही ना? भाजपने नेहरूंचा द्वेष इतका वाढवलाय की, मुंबईतील मेट्रो स्थानकावरूनही त्यांचं नाव काढलं गेलं. तरीसुद्धा गडकरींच्या समजदारीला सलाम आहे.”
या विधानांमुळे आगामी काही महिन्यांमध्ये देशातील राजकारणात खळबळजनक घडामोडी होण्याची शक्यता चर्चेत आली आहे.