अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड मत मांडले. त्यांनी राजकारणात मतभेद आणि वैचारिक विविधता असली तरी सौहार्द टिकून राहायला हवा, असे मत व्यक्त केले.

यानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या दरम्यान मोदींनी पवारांसाठी खुर्ची सरकवली आणि त्यांना पाणीही भरून दिले. या कृतीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका करत खोचक प्रतिक्रिया दिली.
राऊत म्हणाले, “माझा अंदाज होता की पंतप्रधान मोदी पवारांच्या शेजारी बसणार नाहीत. कारण भटकत असलेल्या आत्म्यांच्या जवळ त्यांना राहता येते का? पीएमओने त्यांना परवानगी कशी दिली?” तसेच, त्यांनी मराठीतील प्रसिद्ध म्हण ‘देखल्या देवा दंडवत’ असा उल्लेख करत मोदींच्या कृतीवर उपरोधिक टीका केली.
याशिवाय, शरद पवार यांचा पक्ष फोडला गेला आणि त्यांच्या कुटुंबात फूट पाडली गेली, असे मुद्दे उपस्थित करत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.