शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चेवर मोठे विधान केले आहे. मोदी आता 75 वर्षांचे होत असल्याने त्यांना निवृत्त व्हावे लागेल, असे ते म्हणाले. मात्र, ही निवृत्ती कोण ठरवणार, यावर त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

संघाच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह
राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी म्हणतात की संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. पण त्यांनी हा निष्कर्ष कसा काढला? स्वातंत्र्य लढ्यात संघाचा सहभाग नव्हता. संघाच्या योगदानाबाबत त्यांनी नीट माहिती घ्यावी.”
मोदींनी स्वतःच केलेले नियम लागू होतील?
राऊत पुढे म्हणाले, “मोदी यांनी स्वतःच 75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम तयार केला आहे. मग आता तो त्यांच्यासाठीही लागू झाला पाहिजे. फडणवीस हे ठरवणार नाहीत की मोदींना पुढे राहायचे की नाही.”
“कोण बाप? कोणाचा बाप?”
फडणवीस यांच्या ‘बाप जीवंत असताना वारसदार ठरवला जात नाही’ या विधानावरही राऊतांनी जोरदार टीका केली. “मोदी कोणाचा बाप नाहीत. ते केवळ पंतप्रधान आहेत, ही तात्पुरती व्यवस्था आहे. भगवान राम आणि कृष्ण यांनीही आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर जगाचा निरोप घेतला. तसेच मोदींचेही आता कार्य संपले आहे,” असे ते म्हणाले.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप कडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.