मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही अनेकांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे अनेक महिलांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब झाल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, या तांत्रिक समस्या आता दूर करण्यात आल्या असून, आज (२७ फेब्रुवारी २०२५) लाभार्थी महिलांच्या खात्यात १,५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता वेळेवर जमा झाला होता, त्यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठीही महिलांमध्ये अपेक्षा आहे.
योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अलीकडे काही बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला सर्व अर्जदार महिलांना हा आर्थिक सहाय्य मिळत होते, मात्र आता अर्जांची तपासणी केली जात आहे. पात्रतेचे निकष लागू केल्यामुळे जवळपास ९ लाख अर्ज अपात्र ठरले आहेत. केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ दिला जात आहे.
राज्य सरकारने या योजनेसाठी ३,४९० कोटी रुपयांची तरतूद केली असून, उर्वरित पात्र लाभार्थींना लवकरच त्यांचा हप्ता मिळेल. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.