शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या काय बापाचं जातं, असं वक्तव्य केलं होतं, त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. संजय शिरसाट जे बोलले त्यात चुकीचं वाटत नाही, मात्र संयम ठेवून बोललं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान आता फडणवीस यांच्या या सल्ल्यावर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते सोलापुरात बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जपून बोलण्याचे आदेश दिलेत ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. बोली भाषेत कोणी काही बोललं तर त्याचा विपर्यास होतो, मात्र त्याबाबत आम्ही काळजी घेत आहोत, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, कामाला लागा, सत्ता आपलीच येणार आहे, असं राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. यावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता असे बोलतो. त्यामुळे राज ठाकरेंचे विधान गैर नाही. प्रत्येक नेता सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करतो. कोणत्याही पक्षाचे अखेरचे समीकरण हे सत्ता असते, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. आम्हाला कोणाची भांडण लावण्यात इंटरेस्ट नाही. दोन भाऊ एकत्र आले तर त्यांची युती मजबूत होईल असंही यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.
आज भंडारा येथे बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवसेनेचा बाप मीच, असं फुके यांनी म्हटलं आहे. दरम्यान परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. फुके यांनी माफी मागणी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली आहे, यावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फुके नक्की काय बोलले ते मी ऐकलं नाही, अन्यथा चांगल्या भाषेत उत्तर देण्याचे कसब माझ्याकडे आहे, असं यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.