मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्याची पुष्टी करत पुढील कारवाई सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट वक्तव्य
विधानभवनात दाखल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आज धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सुपूर्द केला असून, तो मी स्वीकारला आहे. पुढील प्रक्रियेसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांना मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.”
राजीनाम्याची मागणी आणि पार्श्वभूमी
गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत होते. विशेषतः, या हत्येचा मास्टरमाइंड म्हणून सीआयडीच्या आरोपपत्रात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव समोर आल्याने राजकीय वातावरण अधिक तापले होते.
पुढील राजकीय हालचालींवर लक्ष
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सरकार पुढील काय पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी या प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात उठवण्याचे संकेत दिले असून, सत्ताधारी पक्षाचीही पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.