मुंबईच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुरू असलेला मेट्रो प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे. गुरुवारी मेट्रो मार्ग ७ अ वरील महत्त्वाचा बोगदा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. यावेळी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाची पाहणी केली आणि पुढील वर्षभरात मुंबई मेट्रोचा एकूण १५० किलोमीटरचा मार्ग तयार होईल, अशी माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या नव्या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, कठीण परिस्थितीत हे काम पूर्ण झाले असून याचा थेट फायदा मुंबईकरांना होणार आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
याचवेळी हिंदी भाषा सक्तीच्या शिक्षण धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “देशभर एक संपर्क भाषा असावी हा केंद्राचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्रातील प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगून ती शिकली पाहिजे. यासोबतच इंग्रजी, हिंदी आणि देशातील इतर भाषा देखील शिकायला हव्यात.”
मुंबई मेट्रो प्रकल्पाचा आढावा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) मुंबई आणि परिसरासाठी अनेक महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. एकूण ३३७ किलोमीटर लांबीच्या मेट्रो जाळ्याचे उद्दिष्ट आहे, ज्यापैकी बराचसा भाग आता अंतिम टप्प्यात आहे.
आजवर वर्सोवा ते घाटकोपर (मार्ग १), दहीसर पूर्व ते डी. एन. नगर (मार्ग २ अ) आणि गुंदवली ते दहिसर पूर्व (मार्ग ७) यांसारखे मार्ग पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुल्या करण्यात आले आहेत. तसेच वडाळा ते कासारवडवली (मार्ग ४), कासारवडवली ते गाईमुख (४ अ), ठाणे ते कल्याण (५), स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (६), अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (७ अ), दहीसर ते मीरा भाईंदर (९) आणि कल्याण ते तळोजा (१२) या मार्गांची कामे जोरात सुरू आहेत.
विशेष म्हणजे, अंधेरी पूर्वपासून दहिसर पूर्वपर्यंतची रेडलाईन मेट्रो सेवा आधीच सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा विस्तार (मार्ग ७ अ) हे महत्त्वाचे जोडणारे टप्पे असून, ते पश्चिम द्रुतगती मार्ग व सहार उन्नत मार्गाच्या समांतर जातील.
मार्ग ७ अ ची लांबी अंदाजे ३.४ किलोमीटर असून, हा मार्ग मुंबईतील संपूर्ण मेट्रो नेटवर्कच्या दृष्टीने एक मोठा टप्पा मानला जात आहे.