मुंबईतील दादर, माहिम आणि शिवाजी पार्क या परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या समस्येवर आवाज उठवत ठाकरे गटाने आज दादरमधून महापालिका कार्यालयाकडे हंडा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेतला.

मोर्चाचे नेतृत्व आमदार महेश सावंत यांनी केले. आंदोलनादरम्यान “जोपर्यंत पाणी नाही, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांच्या हाती रिकामे हंडे होते, ज्यातून पाणीटंचाईचा प्रश्न अधिक ठळकपणे मांडण्यात आला.
मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि काही शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आपला विरोध नोंदवला.
शिवसेना नेत्या श्रद्धा जाधव यांनी यावेळी सांगितले की, “आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. माझ्या हातात हंडा नाही, पण आम्ही मागे हटणार नाही.” तर महेश सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मोर्चाला पोलिस परवानगी देत नाहीत, पण आम्ही पालिका कार्यालयात जाणारच.”
या आंदोलनामुळे दादर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून, नागरिकांच्या पाणीपुरवठा समस्येकडे लक्ष वेधण्याचा ठाकरे गटाचा हा प्रयत्न ठरला आहे.