मुंबईतील आकाशवाणी येथील आमदार निवासात राहणाऱ्या एका व्यक्तीचा, रुग्णवाहिकेच्या उशिरामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे निवासस्थान मंत्रालयाच्या अगदी शेजारी असूनही तिथे वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही.

ही व्यक्ती सोलापूर जिल्ह्यातील चंद्रकांत धोत्रे होती, जे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते विशाल धोत्रे यांचे वडील होते. काही कामानिमित्त ते मुंबईत आले होते आणि आमदार निवासातील खोली क्रमांक ४०८ मध्ये मुक्कामाला होते.
रात्री १२.३० वाजता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. घरच्यांनी आणि उपस्थितांनी तत्काळ रुग्णवाहिकेला अनेक वेळा फोन केला, मात्र कोणतीही अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली नाही. शेवटी पोलिसांना संपर्क साधावा लागला आणि पोलिसांच्या वाहनातून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंत्रालयासारख्या संवेदनशील परिसरातही रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसेल, तर इतर भागातील सामान्य जनतेला काय परिस्थिती असते, हे लक्षात येते.
यापूर्वी पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे वैद्यकीय सेवांवरील अविश्वास वाढला होता. आणि आता मुंबईत असा प्रकार घडल्यामुळे, आपत्कालीन वैद्यकीय सेवांतील दिरंगाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.