शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईतून पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. या वेळी हा धक्का कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याकडून नव्हे, तर ठाकरे कुटुंबाशी वैयक्तिक नाते असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या रूपात आला आहे. त्यांनी पक्षाच्या महिला विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेच्या माजी नगरसेविका असून, त्या दिवंगत शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून देखील आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी केवळ राजकीय नाही तर वैयक्तिकदृष्ट्याही एक मोठा धक्का मानला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअॅपद्वारे आपला राजीनामा स्थानिक विभागप्रमुखांकडे पाठवला. त्यांच्या राजीनाम्यामध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व पक्षाचे आभार मानत, आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या निर्णयामागे स्थानिक पातळीवर असलेली नाराजी हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पती अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान मॉरिस नरोन्हा यांनी हत्या केली होती. त्यानंतर पक्षाकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याची नाराजीही यामागे असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय काही आठवड्यांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्या मेसेजमध्ये त्यांच्या पतीच्या हत्येचा संदर्भ देत धमकीवजा मजकूर लिहिण्यात आला होता. अशा परिस्थितीत त्यांनी राजकीयदृष्ट्या वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला असावा, असे जाणकारांचे मत आहे.
सध्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते तेजस्वी घोसाळकर यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्या भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये नुकसानीचा फटका बसू शकतो.
या घटनाक्रमामुळे शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि नेतृत्वावरील प्रश्न पुन्हा समोर आले आहेत. आगामी काळात घोसाळकर यांचा राजकीय प्रवास कोणत्या दिशेने जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.