छत्रपती शिवाजी महाराजांसाठी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी नवी जागा सुचवत खासदार उदयनराजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. मुंबईतील गव्हर्नर हाऊस परिसरात तब्बल 48 एकर क्षेत्र मोकळं आहे. ही जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस समर्पित भव्य स्मारकासाठी वापरावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
उदयनराजे म्हणाले, “मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. मीही त्या वेळी उपस्थित होतो. मात्र पर्यावरणविषयक अडचणीमुळे हे स्मारक तिथे उभारणं कठीण ठरतंय. अशावेळी गव्हर्नर हाऊससारख्या मोठ्या जागेचा विचार करायला हवा.”
ते पुढे म्हणाले, “राज्यपालांच्या निवासासाठी किती जागा लागते? अख्खी 48 एकर जागा राखून ठेवणं योग्य आहे का? ही जागा ऐतिहासिक स्मारकासाठी उपयोगात आणली तर महाराजांचा इतिहास उजळून निघेल.”