यंदाच्या वर्षी मान्सूनने वेळेआधीच आपली उपस्थिती नोंदवली असून, तो सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला आहे. हवामान खात्याचे जेष्ठ वैज्ञानिक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन या भागांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे यावर्षी मान्सून लवकर येण्याची शक्यता असून, महाराष्ट्रात 6 जूनपर्यंत पावसाचे आगमन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारताच्या हवामान विभागाने यंदा केरळमध्येही पावसाचे आगमन नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधी होईल, असे नमूद केले आहे. 2008 नंतर पहिल्यांदाच असा प्रकार घडतो आहे. केरळमध्ये सामान्यतः 31 मे रोजी मान्सून पोहोचतो, मात्र यंदा तो 27 मे रोजीच केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर गोव्यात 5 जूनला आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात 6 जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.
सध्या मान्सून अंदमान बेटांवर स्थिरावलेला असून, 13 मेपर्यंत तो निकोबार बेटांवर पोहोचेल. 15 मेनंतर त्याची गती अधिक वाढेल आणि तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल. तसेच श्रीलंकेच्या काही भागांसह संपूर्ण अंदमान बेट आणि दक्षिण बंगालच्या उपसागरावर त्याचा प्रभाव जाणवेल.
हवामान विभागाने यावर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडेल, असा अंदाज दिला आहे. 106 टक्के सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील 20 वर्षांतील हवामान खात्याचा पावसावरील अंदाज 2015 साल वगळता बरोबर ठरला आहे. यंदा अल-निनो किंवा ला-निना यासारख्या हवामान घटकांचा फारसा प्रभाव राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाचे आगमन कधी, कुठे?
5 जून: गोवा, कर्नाटक, आंध्र किनारपट्टी, पश्चिम बंगाल
6 जून: महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील अंतर्गत भाग
10 जून: मुंबई, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, बिहार, झारखंड
15 जून: गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश
20 जून: राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड
25-30 जून: हरियाणा, उर्वरित राजस्थान, नवी दिल्ली
दरम्यान, महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.