महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाने यासंदर्भात विधीमंडळाकडे अधिकृत माहिती मागवली होती, त्यावर विधीमंडळाने उत्तर दिले आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणते नियम?
विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडीसाठी कोणत्याही विशिष्ट संख्याबळाची आवश्यकता नाही तसेच, महाराष्ट्र विधानसभा नियमांमध्ये यासाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याचे विधीमंडळाने स्पष्ट केले आहे. प्रचलित संसदीय परंपरांनुसार विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतात, असेही पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाकरे गट आजच अर्ज दाखल करणार?
या उत्तरानंतर ठाकरे गट विरोधी पक्षनेते पदासाठी लवकरच दावा करू शकतो. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने ठाकरे गटाने आजच अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीचे संख्याबळ किती?
महाविकास आघाडीतील एकूण आमदारसंख्या 46 असून, त्यात ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. ठाकरे गटाकडे सर्वाधिक आमदार असल्याने विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यास त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते.