मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वेव्ह्स समिट 2025’ मध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडणार आहेत. त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या तब्बल १.७३ लाख कोटी रुपये मूल्याच्या रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू आहे, ज्यामध्ये १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

फडणवीसांनी सांगितले की, या प्रकल्पांमधून केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील इतर भागांतीलही रेल्वे सुविधा अधिक आधुनिक व सुटसुटीत होणार आहेत. यामध्ये विशेष ठळक बाब म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ ही लवकरच सुरु होणार आहे. या सर्किट ट्रेनद्वारे प्रवाशांना राज्यातील ऐतिहासिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांना भेट देता येणार असून, दहा दिवसांचा टूर यामध्ये समाविष्ट असेल.
याशिवाय, गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पामुळे विदर्भ आणि छत्तीसगड-तेलंगणामधील व्यापाराला मोठी चालना मिळेल.
त्यांनी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की, आजवर जेवढा निधी मागील सरकारच्या दहा वर्षांत मिळाला नव्हता, त्याच्या अनेक पटींनी अधिक निधी आज महाराष्ट्राला मिळतो आहे. या सगळ्या प्रकल्पांचा उद्देश म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासाला रेल्वे मार्गे बळकटी देणे.