Raj Thackeray: महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करत आहे, बाहेरून येणाऱ्यांना मराठी कशी शिकवता येईल याचा विचार करत नाही. मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग राज ठाकरे बोलतो तेव्हा संकूचित कसा? अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या हिंदी सक्तीवर प्रहार केला. शेकापच्या वर्धापन दिनी माजी आमदार जयंत पाटील यांच्याकडून राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना निमंत्रित केले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.
मग राज ठाकरे संकूचित कसा?
हिंदीच्या सक्तीवरूनही राज ठाकरे यांनी गुजरातचे उदाहरण देत फडणवीसांच्या भुमिकेचा समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये आहे का हिंदी? सक्तीमागील याचं राजकारण समजून घेतलं पाहिजे. भाषा आणि जमीन गेली जगाच्या पाठीवर स्थान नाही. गुजरातमध्ये तुम्हाला शेतजमीन विकत घेता येत नाही. पीएम गृहमंत्र्यांच्या राज्यात कोणीही नागरिक जमीन घेऊ शकत नाही. फेमा कायद्याने आरबीआयकडून परवानगी घ्यावी लागते. मग आम्ही आमच्या राज्याचा विचार का करायचा नाही? अशी विचारणा त्यांनी केली. 20 हजार बिहारींना गुजरातमधून हाकलून देणारा भाजपचा आमदार होतो, मग राज ठाकरे संकूचित कसा? अशीही विचारणा त्यांनी केली. ठाण्यात, रायगडात कोण जमीन घेतंय माहीत नाही. कोकणात जमीनीच्या जमिनी विकल्या, यामुळे आम्हीच संपणार हे आपल्याच माणसांना माहीत नाही.

अटक करून दाखवाच
राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्यावरूनही राज्य सरकारला थेट आव्हान दिले. ते म्हणाले की, तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात. कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार अटक करेल. एकदा करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग नाही येणार, असा थेट इशारा राज यांनी दिला.
पक्षाचा विचार न करता रायगडाचा विचार करा
राज ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाची स्थापन झाली. शिवसेनेच्या 81 च्या अधिवेशनाला डांगे आले होते. शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये विस्तवही जात नव्हतं. तेव्हा भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होते. आज लाल व्यासपीठावर दोन भगवे ध्वज एकत्र आले आहेत. मात्र, शेकापच्या व्यासपीठावर मी पहिल्यांद आलो नसून पाच वर्षापू्वची जयंतरावांचा प्रचाराला आलो होतो, अशी आठवण राज यांनी सांगितली. राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही पक्षाचा विचार न करता राज्यकर्त्याचं लक्ष नसेल, तर प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही. याचं भीषण उदाहरण रायगड जिल्हा झाला आहे. रायगडच्या जमिनी कुठं जात आहेत? जयंतराव रायगडची जबाबदारी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.