मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे या तीन पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण हालचाली पाहायला मिळाल्या. सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी झाली.

यानंतर दुपारी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे तीन वरिष्ठ नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
उद्धव ठाकरे गटाचे तीन बडे नेते फडणवीस यांच्या भेटीला
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) गटातील तीन महत्त्वाचे नेते मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवे यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सूत्रांनुसार, दादर येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पुढील टप्प्याच्या कामावर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली.
मात्र, भेटीनंतर या नेत्यांनी माध्यमांसमोर कोणतेही वक्तव्य केले नाही. विशेषतः अंबादास दानवे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे ही भेट फक्त स्मारकासाठी होती की राजकीय चर्चेचा भाग होती? यावरून चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे-फडणवीस भेटीमागे काय संकेत?
मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची झालेली भेट आणि त्यानंतर शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांची फडणवीस यांच्यासोबत बैठक यामुळे वेगवेगळ्या राजकीय शक्यता चर्चेत येत आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट ही अनौपचारिक असल्याचे स्पष्ट केले.
मात्र, काही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांबाबत आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत या भेटी होत असाव्यात. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यामुळे या भेटीला वेगळे राजकीय महत्त्व दिले जात आहे.
– महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी नवे समीकरण पाहायला मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल.