भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात मराठी भाषेच्या व महत्त्वाच्या प्रश्नांवर होत असलेल्या दुर्लक्षावर त्यांनी परखड शब्दांत नाराजी व्यक्त केली. मराठी माणसांच्या अस्मितेची गळचेपी करणाऱ्यांशी हातमिळवणी करणाऱ्या सरकारवर ठाकरे यांनी तीव्र टीका केली.

“हे सरकार महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं आहे का?” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यांनी भाजपाचे नाव न घेता टोला लगावत सांगितले की, सरकार सत्तेत आल्यापासून ‘मराठी नाही येत’, ‘मराठी लोक घाणेरडे आहेत’ अशा प्रकारची वक्तव्ये खुलेआम ऐकायला मिळत आहेत. “देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावं लागतं, तसं आता महाराष्ट्रात राहायचं असेल तर जय महाराष्ट्र म्हणावं लागेल,” असेही ठाकरे म्हणाले.
हिंदुत्वावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, “आमचे हिंदुत्व हे धर्माच्या शुद्धतेचे पालन करणारे आहे. आम्ही मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणारे आहोत. हिंदी आमचं वैरी नाही, पण हिंदी भाषेची सक्ती आम्ही कधीही सहन करणार नाही.” तामिळनाडूचे उदाहरण देत ठाकरे म्हणाले, “तेथे स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत, तिथे हिंदी सक्तीविरोधात कोण बोलतं का? मग महाराष्ट्रातच हिंदी लादायचं का?”
उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर सवाल उपस्थित करत सांगितले की, त्यांच्या काळात सर्व दुकानांच्या पाट्यांवर मराठीत नाव लिहिणे बंधनकारक केलं होतं. मात्र, सध्याच्या सरकारने याची कितपत अंमलबजावणी केली हे सर्वांसमोर आहे. काही लोक न्यायालयात गेले आणि मराठीला विरोध केला. “इथे राहतात, इथलं खातात, पण मराठीचा विरोध करतात, याला काय म्हणायचं?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
घाटकोपरमधील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी “मुंबईत मराठी येणं आवश्यक नाही” असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “फडणवीसजी, आधी घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. तिथे प्रत्येक व्यक्तीने मराठीत बोलायलाच पाहिजे.” त्यानंतर हिंदीचा प्रश्न आपण पाहून घेऊ, असेही त्यांनी ठासून सांगितले.
“आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही. आमच्यात उत्तर भारतीय आहेत, मुस्लिम शिवसैनिक आहेत. पण मराठीचा सन्मान सर्वांनी करायलाच हवा,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.