राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला असला तरी मंत्र्यांमधील समन्वयाचा अभाव समोर येतो आहे. विशेषतः राज्यमंत्र्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यांच्या मते, कॅबिनेट मंत्र्यांनी अद्यापही त्यांच्याकडे अपेक्षित अधिकार सोपवलेले नाहीत.

याच पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर नुकत्याच झालेल्या आरोग्य सन्मान पुरस्कार कार्यक्रमाला गैरहजर राहिल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, ही अनुपस्थिती त्यांच्या नाराजीचं प्रतीक होती. या घटनेनंतर अनेक राज्यमंत्र्यांनी खासगीत आपली नाराजी व्यक्त केली असून, आता एकत्रितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गृहखाते हाताळत असताना, त्यातील काही अधिकार शिवसेना गटाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे सोपवले आहेत. त्यामुळे योगेश कदम यांना काम करण्याची मोकळीक मिळालेली आहे. मात्र इतर कॅबिनेट मंत्र्यांनी मात्र आपल्या राज्यमंत्र्यांना असे अधिकार दिलेले नाहीत, हेच राज्यमंत्र्यांच्या नाराजीचं मुख्य कारण मानलं जातंय.
राज्यातील मंत्रिमंडळात सध्या ३८ मंत्री कार्यरत आहेत. यामध्ये भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ मंत्री आहेत. यापैकी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ही संख्या कमी झाली आहे. त्यातच पालकमंत्रीपदांवरूनही काही जिल्ह्यांमध्ये वाद सुरुच आहेत.
या साऱ्या पार्श्वभूमीवर, आता मुख्यमंत्री फडणवीस या वादात काय भूमिका घेतात आणि राज्यमंत्र्यांची नाराजी कशी सोडवतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.