विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून, गेल्या दोन दिवसांपासून अधिवेशनात मोठे वादंग झाले. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी समन्वय समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विधिमंडळातील समित्यांचे वाटप कसे करायचे, याचा अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि संदीपान भुमरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे सहभागी झाले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत भाजपला ११ समित्या, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ७ समित्या, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४ समित्या देण्याचा निर्णय झाला आहे. उर्वरित ७ समित्यांचे वाटप अजून निश्चित करण्यात आलेले नाही.
विशेष म्हणजे, मंत्रिपद मिळू न शकलेल्या भाजपच्या काही आमदारांना या समित्यांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच महामंडळ वाटपावरून महायुतीत अजूनही मतभेद असल्याचे बोलले जात आहे. पुढील काही दिवसांत हे समीकरण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.