देशात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा ५० रुपयांची वाढ झाल्याने सामान्य गृहिणींचं आर्थिक गणित कोलमडल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, भाजपच्या महिला नेत्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं खुले आवाहन केलं आहे.

राऊत म्हणाले, “यूपीएच्या काळात स्मृती इराणी महागाईविरोधात रस्त्यावर उतरून सिलेंडर घेऊन बसत होत्या. आता त्याच स्मृती इराणी आणि भाजपच्या महिला नेत्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं. सिलेंडर आम्ही पुरवतो, तुम्ही आंदोलन करा.”
तसंच त्यांनी स्पष्ट केलं की, ही केवळ राजकीय भूमिका नाही, तर देशातील लाखो गृहिणींच्या रोजच्या जगण्याचा हा प्रश्न आहे.
“आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका”
सरकारकडून सामान्य नागरिकांना सतत फसवलं जातं आहे. निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहिण’ योजना आणायची आणि नंतर त्याच महिलांना दुर्लक्षित करायचं – हा भाजपचा खरा चेहरा असल्याची टीकाही राऊत यांनी केली.
शिंदेंच्या खात्यांतील भ्रष्टाचारावरून टीका
नगरविकास खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कॅगच्या अहवालाचा दाखला देत त्यांनी चौकशीची मागणी केली.
ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
साताऱ्यात झालेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा दाखला देत, राऊतांनी ईव्हीएममधील घोटाळ्याचं मुद्दाम उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, चार महिन्यांपूर्वी भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकले होते, परंतु आता त्याच मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत विरोधी पॅनलने २१ पैकी २१ जागा जिंकल्या. हे परिवर्तन सहज शक्य नाही, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.