दादरमध्ये भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोठा राजकीय संदेश दिला. मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युतीसाठी ते तयार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र, यासाठी त्यांनी एक महत्त्वाची अटही घातली आहे.

ठाकरे म्हणाले, “मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी जे किरकोळ वाद आहेत, ते बाजूला ठेवायला मी तयार आहे. लहानसहान भांडणांपेक्षा मोठा दृष्टिकोन ठेवणं आज आवश्यक आहे. मी सर्व मराठी बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन करतोय. हे फक्त माझ्या स्वार्थाचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या भवितव्याचा प्रश्न आहे.”
यावर राज ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. “एकत्र राहणं कठीण नाही, इच्छा हवी,” असं म्हणत त्यांनीही एकत्र येण्याची तयारी दर्शवली.
मात्र, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “माझी एक अट आहे — जेव्हा आम्ही लोकसभेत सांगत होतो की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे जात आहेत, तेव्हा जर सर्वांनी एकत्र विरोध केला असता, तर महाराष्ट्राचे मोठे नुकसान टाळता आले असते. त्या वेळी जर ठाम भूमिका घेतली असती, तर आज केंद्रात व राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचे सरकार स्थापन झाले असते. म्हणून, आता जे कोणी महाराष्ट्राच्या विरोधात जाईल, त्याला मी साथ देणार नाही. त्यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
ठाकरे पुढे म्हणाले, “जोपर्यंत महाराष्ट्राचं हित सर्वप्रथम मानलं जात नाही, तोपर्यंत कोणताही राजकीय निर्णय घेता येणार नाही. हे ठरवलं तरच एकत्र येणं शक्य आहे.”
तसेच त्यांनी भाजपवरही टीका केली. “गद्दारीच्या सर्टिफिकेटवर मंत्रीपदं मिळतात का? शिक्षणाचं धोरण ठरवायला अशा लोकांची गरज आहे का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सडकून टीका केली.
शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी म्हटलं, “तुम्ही ठरवा, महाराष्ट्रासाठी कुणासोबत जायचं — भाजपसोबत की माझ्यासोबत. जर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी निर्णय घ्यायचा असेल तर स्पष्ट भूमिका घ्या. बिनशर्त समर्थन द्या किंवा विरोध करा, पण गद्दारांची संगत सोडाच.”
यावेळी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेण्याचा सल्लाही दिला आणि सांगितलं की, “पहिली शपथ घ्या, मग टाळी द्या.”