राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याच दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संभाव्य युतीवर भाष्य केलं आहे आणि पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेताना, उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “मनसेसोबत युती करायची की नाही, हा निर्णय पक्ष पातळीवर घेतला जाईल. मात्र, कार्यकर्त्यांनी सर्व जागांसाठी तयारीला लागावं.”
या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आगामी महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांवर (ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार) भर देत आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी गटप्रमुखांची नेमणूक झालेली नाही, तिथे लवकरात लवकर गटप्रमुखांची नियुक्ती करण्यात यावी.
संघटनात्मक तयारीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कोर्टाच्या निर्णयानुसार नव्या प्रभाग रचनेनुसार रणनीती ठरवण्यास सांगितले. तसेच, प्रत्येक घटनेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचं आवाहनही केलं.
मनसेसोबत युतीबाबतच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. जर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची युती झालीच, तर त्या युतीचं स्वरूप, जागावाटप आणि रणनीती कशी असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी याआधी अप्रत्यक्षपणे युतीचे संकेत दिले होते. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय निर्णय राज्याच्या राजकारणाला नवा वळण देऊ शकतो.