महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती – अमित ठाकरे (मनसे), सदा सरवणकर (शिवसेना – शिंदे गट), आणि महेश सावंत (शिवसेना – ठाकरे गट).

भाजप नेते आशिष शेलार यांची टीका
निवडणुकीत मनसेला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजप महायुतीकडे पाठवणारे आशिष शेलार आता मनसेवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मनसेने मराठी भाषा, मराठी माणूस, आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर वेळोवेळी आवाज उठवला असला, तरी प्रत्यक्षात मराठी माणसासाठी काय केले, हा सवाल उपस्थित करत त्यांनी मनसेला खुले आव्हान दिले आहे.
“मनसे फक्त मोठमोठ्या घोषणा करते, पण प्रत्यक्ष कृती कुठे आहे? जर खरोखरच मराठी माणसासाठी काही केले असेल, तर त्यांनी 4 कामं दाखवावी,” असे शेलार यांनी म्हटले आहे.
“बोलाचीच कढी आणि बोलाचा भात?”
शेलार यांनी मनसेला “फक्त टीका करणारा पक्ष” असे म्हणत टोला लगावला आहे. “स्वतःच्या कामांची जाहिरात करणे आणि इतरांवर टीका करणे हे भोपूपणाचे काम आहे, आणि तेच मनसे करत आहे,” असे ते म्हणाले.
मनसेची पुढील रणनीती काय?
आशिष शेलार यांच्या या वक्तव्यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते, आणि ते भाजपच्या या आव्हानाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.