महाराष्ट्र सरकारने नुकतंच जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा तृतीय भाषेच्या रूपात सक्तीची करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने स्पष्टपणे सांगितले आहे की, ते हिंदीच्या सक्तीला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाहीत.

‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना हिंदी शिकण्याचा पर्याय दिला जात असे, मात्र आता ते अनिवार्य केले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांनी लिहिले, “आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही…” हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. या ट्विटसोबत देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटोही शेअर केला आहे.
राज ठाकरे यांनी यापूर्वीच आपला रोष व्यक्त करत म्हटले होते की, “हिंदी भाषा शिकण्याची सक्ती आम्ही सहन करणार नाही.” आता संदीप देशपांडेंच्या ट्विटमुळे मनसेचा विरोध अधिक ठळकपणे समोर आला आहे. मनसेने हिंदीच्या सक्तीविरुद्ध केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर रस्त्यावरही आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेने विरोधात बॅनर लावले आहेत. यशवंत किल्लेदार यांनीही एक मोठा पोस्टकार्डसदृश बॅनर लावला आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. या बॅनरवर प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या ओळी झळकताना दिसतात:
“पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी,
आपुल्या घरात हाल सोसते मराठी,
हे असे कितीक खेळ पाहते मराठी,
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी.”
या ओळींमधून मराठी भाषेची घुसमट आणि स्वाभिमान ठळकपणे व्यक्त केला आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे जरी तीन भाषांमध्ये हिंदी सक्तीची झाली असली तरी, अनेक मराठीप्रेमी संघटनांनी आणि व्यक्तींनी यावर आपला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. मराठी विद्यार्थ्यांवर अन्य भाषेची सक्ती लादण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मनसेने आपली भूमिका अगदी सुरुवातीपासून स्पष्ट ठेवली आहे की, मराठी अस्मिता आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या बाबतीत कोणतीही सक्ती मान्य केली जाणार नाही. येत्या काळात या विरोधात आणखी आंदोलनं आणि कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.