विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीवरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मध्यरात्रीच्या भेटीची चर्चा
दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, ही भेट सांगली जिल्ह्यातील महसूल विषयक प्रकरणांशी संबंधित होती आणि याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये.
सरकारकडून विशेष सुविधा?
या भेटीनंतर राजकीय हालचाली वेगाने घडताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील आणि राष्ट्रवादी नेते उत्तम जानकर यांना सरकारकडून खासगी सहाय्यक (PA) नियुक्त करण्यात आले आहेत, आणि त्याचा पगार सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे.
विरोधात आंदोलन करणाऱ्या जानकरांना सुविधा?
विशेष म्हणजे उत्तम जानकर यांनी ईव्हीएमबाबत सरकारविरोधात आंदोलन उभारले होते आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. अशा परिस्थितीत सरकारने त्यांना ही सुविधा देण्यामागे काय हेतू आहे, यावर आता जोरदार चर्चा सुरू आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
या घडामोडींमुळे शरद पवार गटातील नेते भाजपच्या जवळ जात आहेत का? सत्ता समीकरणांमध्ये मोठे बदल होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील काही दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.