भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांमध्ये (DGMO) महत्त्वाची चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून LOC वर सुरू असलेल्या घडामोडींनी परिस्थिती तणावपूर्ण केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर धडक कारवाई केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या पेटल्या.

६ आणि ७ मेच्या रात्री भारतीय लष्कराने अत्यंत अचूक आणि नियोजनबद्ध हल्ला करत पाकिस्तानच्या नियंत्रणातील भागात दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं. या कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तरात्मक हल्ले करण्यात आले. मात्र, भारतीय लष्कराने अत्यंत प्रभावीपणे या सर्व हल्ल्यांना प्रत्युत्तर देत पाकिस्तानला मागे हटवले.
९ मे रोजी भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर हवाई हल्ला केला आणि १० मे रोजी जोरदार तोफगोळ्यांचा मारा करत लष्करी दडपशाही वाढवली. या कृतीमुळे पाकिस्तानवर मोठा दबाव आला आणि शेवटी त्यांनीच शस्त्रसंधीची मागणी केली. लष्करी सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या DGMO ने भारतीय समकक्षांशी हॉटलाइनवर संपर्क साधून चर्चा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर १० मे रोजी दुपारी ३.३० वाजता दोन्ही देशांतील DGMO स्तरावर चर्चा झाली आणि त्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली. भारतानेही आपले उद्दिष्ट साध्य झाल्याचे सांगत ती मान्य केली.
DGMO लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत या घटनाक्रमाची माहिती दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताने अत्यंत आक्रमक धोरण अवलंबून पाकिस्तानला गुडघे टेकायला लावलं आहे. त्यांनी असंही नमूद केलं की, ही चर्चा केवळ लष्करी पातळीवरच होणार असून कोणतीही राजनैतिक वाटाघाटी सध्या अपेक्षित नाही.
या घडामोडींनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही हालचाली सुरू झाल्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी देखील चर्चा केली. अमेरिकेने दोन्ही देशांना शांततेच्या मार्गावर यायला सांगितले. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या शस्त्रसंधीबाबत ट्विट करत माहिती दिली.
सध्या LOC वर शांतता असली तरी ती तणावपूर्ण आहे. आज दुपारी १२ वाजता भारत आणि पाकिस्तान DGMO यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होणार असून त्यानंतर भारत आपली पुढील रणनिती ठरवेल. शस्त्रसंधी न पाळल्यास भारत पुन्हा जोरदार प्रत्युत्तर देईल, असा स्पष्ट इशारा भारतीय लष्कराकडून देण्यात आला आहे.