सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असताना भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या गंभीर धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नवनीत राणा यांना अज्ञात व्यक्तींनी पाकिस्तानातील विविध मोबाईल नंबरवरून फोन व मेसेजद्वारे धमकावले. या संदेशात अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली की, “हनुमान चालीसा पठण करणारी हिंदू शेरनी आता काही दिवसांची पाहुणी आहे, लवकरच उडवून टाकली जाईल.” यासारख्या वाक्यांनी त्यांना धमकावण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ही पहिली वेळ नाही की नवनीत राणा यांना अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. मागील वर्षीही त्यांना व्हॉट्सअॅपवरून पाकिस्तान व अफगाणिस्तान येथून अज्ञात क्लिप्स पाठवून धमकावण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्यांना धमकी मिळाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता केवळ मुंबई पोलिसांवर न सोडता, केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्याचा विचार करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात पाकिस्तानवर टीका करताना आक्रमक विधान केलं होतं. त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं, “घरात घुसून मारलं, आता कब्र खोदली आहे. देशाच्या गादीवर आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले आहेत. काय बोलता छोटे पाकिस्तान? बकरीची अम्मा किती दिवस खैर मनवेल? एक एकाला शोधून ठार करू.” त्यांच्या या विधानाने सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेचा विषय निर्माण झाला होता.
नवनीत राणा ह्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक वेळा धार्मिक प्रश्नांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या धमक्यांना सामोरं जावं लागतं, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांना अधिक सुरक्षा देण्यात येण्याची शक्यता असून, पोलिसांनी सायबर युनिटच्या मदतीने पाकिस्तानातून येणाऱ्या कॉल्सचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ही धमकी केवळ एका नेत्यासाठीच नव्हे तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीही गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.