पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आता ६०व्या वर्षी लग्न करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी १९व्या वर्षीच जोडले गेलेले घोष, तब्बल ४१ वर्षे अविवाहित राहिले होते. मात्र, आईच्या आग्रहामुळे ते आता विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या होणाऱ्या पत्नी रिंकी मजूमदार या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आहेत.

दिलीप घोष आणि रिंकी मजूमदार यांचा विवाह येत्या शुक्रवारी अगदी साधेपणाने संपन्न होणार आहे. या खासगी समारंभात केवळ कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईकच उपस्थित राहणार आहेत. रिंकी मजूमदार या ५० वर्षांच्या असून, त्या घटस्फोटित आहेत. त्यांचा एक मुलगा आहे जो सध्या आयटी क्षेत्रात काम करतो.
मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास
दिलीप घोष भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना एका कार्यक्रमात रिंकी मजूमदार यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली होती. दिलीप घोष यांच्या आग्रहावरूनच रिंकी भाजपमध्ये दाखल झाल्या. २०२१ मध्ये या दोघांमध्ये मैत्रीचा बंध निर्माण झाला, जो हळूहळू प्रेमात बदलला.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ते मानसिक दृष्ट्या खचले होते. याच काळात रिंकी मजूमदार यांनी त्यांना मानसिक आधार दिला आणि दोघांमधील नातं आणखी घट्ट झालं. रिंकी यांनी विवाहाचा प्रस्ताव दिला असता, सुरुवातीला दिलीप घोष यांनी नकार दिला. पण नंतर त्यांच्या आईच्या आग्रहाने आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी सोबतीची गरज जाणवू लागल्याने त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
संघ कार्यकर्ता म्हणून जीवनशैली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारामुळे दिलीप घोष यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लग्न करण्याची कल्पना त्यांना सुरुवातीला अवघड वाटत होती. मात्र रिंकी मजूमदार यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आणि आईच्या आग्रहामुळे अखेर ते तयार झाले. विशेष म्हणजे, रिंकी यांनी स्वतः दिलीप घोष यांच्या आईशी संवाद साधून त्यांचे मन वळवले.
३ एप्रिलला ईडन गार्डन स्टेडियममध्ये आयपीएल सामन्यादरम्यान दिलीप घोष, रिंकी मजूमदार आणि तिचा मुलगा एकत्र दिसले होते, ज्यावरून या नात्याबाबतची चर्चा जोर धरू लागली.
भाजपमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
दिलीप घोष यांच्या या निर्णयावर भाजपमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी त्यांच्या या वयात लग्न करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं, तर काहींनी त्यांना यासाठी टोकलं आहे. मात्र व्यक्तिगत आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात करत असलेल्या घोष यांना अनेकांकडून शुभेच्छाही मिळत आहेत.