भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमधील तणावग्रस्त संबंध पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भारतातील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानवर कठोर पावले उचलली. या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या ऑपरेशननंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले आणि पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तराचा प्रयत्न झाला. मात्र, भारताच्या पलटवाराने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.

या घडामोडींनंतर अखेर भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धविरामाची घोषणा केली. पण, जरी ही घोषणा झाली असली तरी पाकिस्तानने त्वरितच युद्धविराम तोडल्याचे काही घटना निदर्शनास आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे डीजीएमओ (Director General of Military Operations) आज चर्चा करणार आहेत. या बैठकीआधी भारतीय लष्कराच्या तीनही दलांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये पाकिस्तानला जोरदार इशारा दिला.
या पत्रकार परिषदेमध्ये एअर मार्शल ए.के. भारतीय यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता विनंतीचा काळ संपला असून, जर पाकिस्तानने पुन्हा अशा कृती केल्या, तर युद्ध अटळ आहे.” त्यांनी यावेळी ‘रामचरित मानस’मधील एक चौपाई उद्धृत केली – ‘विनय न मानत जलधि जड़, गए तीनि दिन बीति। बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति।।’ – ज्याचा अर्थ असा की, जेव्हा विनंती ऐकली जात नाही, तेव्हा कठोर कारवाई करावी लागते. “समजदारासाठी इशारा पुरेसा असतो,” असेही त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेत भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनीही पाकिस्तानविरोधात कडक भाषा वापरली. ते म्हणाले, “पुढची लढाई मागच्यासारखी नसेल, कारण आता लष्करी तंत्रज्ञान अधिक प्रगत झाले आहे. आमच्याकडे अशा कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्याची पूर्ण तयारी आहे.” ते पुढे म्हणाले, “देव करो लढाई होऊ नये, पण ती झालीच तर आम्ही अधिक सक्षमपणे प्रत्युत्तर देऊ.”
भारतीय सेनेचा हा इशारा स्पष्ट दर्शवतो की देशाची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि कुठल्याही प्रकारची आक्रमकता सहन केली जाणार नाही. युद्ध टाळणे हीच दोन्ही देशांची प्राथमिकता असावी, पण जर शांततेचा मार्ग दहशतवाद्यांद्वारे वारंवार तोडला गेला, तर भारत तयार आहे – हे भारतीय सेनेने जगजाहीर केलं आहे.