शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सांगलीमधील माळी गल्ली परिसरात रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना भिडेंना एका भटक्या कुत्र्याने पायाला चावा घेतला. या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांना दोन इंजेक्शन देऊन पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पुढील दोन दिवसांत आणखी काही औषधे दिली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या भिडे गुरुजींची तब्येत स्थिर असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.
राजकीय प्रतिक्रिया आणि उपरोधिक टोले
या घटनेनंतर राज्यातील विरोधकांनी उपरोधिक भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर भाष्य करत, “या प्रामाणिक प्राण्याने (कुत्र्याने) असा राग का धरला, याची चौकशी SIT मार्फत व्हायला हवी,” अशी उपरोधपूर्ण मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील सरकारवर टीका करत म्हटले, “महत्त्वाच्या व्यक्तींना चावल्याशिवाय या सरकारमध्ये कुत्र्यांचीही दखल घेतली जात नाही. सामान्य माणसांसाठी न्याय मिळावा म्हणून कदाचित देवाकडे अशी प्रार्थना करावी लागेल.”