सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात राजकारण पुन्हा एकदा पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांच्या चारचाकी गाडीला रात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकार आणि गृहखात्यावर थेट सवाल केले आहेत.
रोहित पवार म्हणाले, “बार्शी तालुक्यात ‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही’ ही म्हण आजच्या घटनेला लागू होते. शांताराम जाधवर यांना काही दिवसांपूर्वी राजकीय द्वेषातून घाणेरड्या भाषेत शिविगाळ करण्यात आली होती. या घटनेला महिना उलटत नाही तोच त्यांच्या गाडीला आग लावली गेली. ही योगायोगाची साखळी नाही, ही नियोजनबद्ध राजकीय सूडाची साखळी आहे.”
या संपूर्ण प्रकारामागे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांचं नाव अप्रत्यक्षपणे घेत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले. “काही महिने आधी शांताराम जाधवर यांना रणवीर राऊत यांनी घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आता गाडी जाळली, उद्या घरावर हल्ला झाला तर याची जबाबदारी कोणाची? राज्याचं गृहखातं आणि पोलीस प्रशासन कधी जागं होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना थेट विनंती करत सांगितलं, “या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या. उद्या जर जाधवर कुटुंबाला काही नुकसान झालं, तर ती जबाबदारी सरळसरळ सरकारची राहील. पोलीस प्रशासन दुसरा संतोष देशमुख घडण्याची वाट पाहत आहे का?”

या घटनेमुळे बार्शीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, आगामी दिवसांत हा मुद्दा आणखी गहिरा होण्याची शक्यता आहे. शांताराम जाधवर यांची गाडी जाळल्याचा तपास सुरू असून, अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. दरम्यान, रोहित पवारांच्या आरोपांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवे परिमाण मिळाले आहे.