‘छावा’ चित्रपटानंतर आता ‘फुले’ या आगामी सिनेमाच्या संदर्भातही वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चरित्रात्मक सिनेमा पूर्वनियोजित तारखेला म्हणजे 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, उद्भवलेल्या वादामुळे आता हा सिनेमा 25 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

या चित्रपटाबाबत राजकीय स्तरावरही चर्चांना उधाण आलं असून, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशात सामाजिक सुधारणांसाठी मोठे योगदान दिलं. महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी अपार संघर्ष केला,” असं त्यांनी सांगितलं.
चित्रपटात जे दाखवण्यात आलं आहे, ते वास्तवाशी मिळतंजुळतं असून, कोणतंही काल्पनिक चित्रण नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले, “फुलेंवर आधारीत साहित्य, सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये जे काही लिहिलं आहे, तेच सिनेमात सादर करण्यात आलंय. त्यामुळे यामध्ये सेन्सॉरचा प्रश्नच कुठे उरतो?”
आरएसएसकडून दबाव असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “महात्मा फुलेंच्या विचारांचे संरक्षण करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. हे मत मांडलं की काही लोक त्याला मूर्खपणाचं म्हणतात. पण सत्य हे सत्यच असतं.”
‘फुले’ या सिनेमात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असून, महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनकार्य यामधून चित्रित करण्यात आले आहे. चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्याच्या प्रदर्शनात विलंब झाला असला, तरी आता २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.