‘फुले’ या आगामी चित्रपटावर काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. ब्राह्मण महासंघाकडून काही दृश्यांवर आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि सेन्सॉर बोर्डानेदेखील काही सूचना केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी दिग्दर्शकांनी ‘फुले’ चित्रपटाबाबत सविस्तर माहिती दिली आणि त्यांना ट्रेलरही दाखवण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या कार्यावर आधारित हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या भेटीनंतर अनंत महादेवन यांनी सांगितले, “राज ठाकरे यांना ऐतिहासिक गोष्टींबाबत सखोल ज्ञान आहे. त्यांनी ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटात दाखवलेली माहिती योग्य असल्याचं मत व्यक्त केलं. त्यांनी चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा असंही मत मांडलं. चित्रपटाच्या पोस्टर डिझाइनबाबतही काही मार्गदर्शन केलं.”
महादेवन यांनी स्पष्ट केलं की, “या चित्रपटातील कोणताही सीन कापण्यात आलेला नाही. ट्रेलर पाहून राज ठाकरे यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि म्हणाले की, संपूर्ण चित्रपट पाहूनच मत बनवा – कारण यामध्ये जे घडलं, तेच दाखवण्यात आलं आहे.”
दरम्यान, मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “जर चित्रपटात सत्य इतिहास मांडला असेल, तर बदलांची गरज नाही. चित्रपट निर्धास्तपणे प्रदर्शित करा. फुलेंच्या जयंतीदिनीच हा चित्रपट यायला हवा होता. यात कोणत्याही जातीचं राजकारण नाही. महापुरुषांना जातीच्या चौकटीत का अडकवताय, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.”
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटात ज्योतिबा फुले यांची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी साकारत असून सावित्रीबाईंच्या भूमिकेत पत्रलेखा झळकणार आहे.