राज्याच्या दोन मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “मंत्री कधी कधी गमतीनं बोलतात. प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करू लागलो तर ते योग्य नाही,” असं फडणवीस म्हणाले.

शिरसाट यांच्या विधानावर फडणवीसांचं समर्थन
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या “सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?” या विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, शिरसाट जे बोलले ते चुकीचं वाटत नाही. हे विधान विनोदी अंगाने केलेलं असून त्यातून चुकीचा अर्थ लावू नये.
मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्यावर खुलासा
राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “मेघना बोर्डीकर यांच्याशी बोलणं झालं आहे. माध्यमांनी त्यांचं विधान अर्धवट दाखवलं आहे.”
बोर्डीकरांचा स्पष्टीकरण काय?
बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं की, ग्रामसेवक महिलांकडून पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी पैशांची मागणी करत होता. वारंवार तक्रार करूनही काहीच परिणाम होत नव्हता. कार्यक्रमात महिलांनी थेट माझ्याकडे तक्रार केली, त्यामुळे मी एक पालक या नात्याने त्या ग्रामसेवकाला समजावलं, असं त्यांनी सांगितलं.
शिरसाट काय म्हणाले होते?
अकोल्यात सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री संजय शिरसाट यांनी व्यासपीठावरून वक्तव्य करताना म्हटलं, “तुम्ही वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करतो. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?” या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात टीका सुरू झाली आहे.