राजकारणात नेहमी धडाडीने काम करणारे, बेधडक विधानांसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राचे फलोत्पादन मंत्री आणि शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगावले यांची एक आगळीवेगळी प्रेमकथा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. नेहमी राजकीय रंगात रंगलेले गोगावले यांचं हे खासगी आयुष्यातील गोड आठवणींचं शेअरिंग अनेकांच्या मनाला भिडत आहे.

13 एप्रिल रोजी गोरेगाव येथे झालेल्या एका सत्कार समारंभात भरतशेठ यांनी त्यांच्या प्रेमाचा आणि विवाहाचा मजेशीर किस्सा उपस्थितांसोबत शेअर केला. त्यांच्या शैलीत मोकळेपणाने बोलताना ते म्हणाले, “मी आधी सरळ बोललो, तिला पटवलं… आणि मगच लग्न केलं!” एवढं म्हणताच सभागृहात हास्याची लाट उसळली.
ते पुढे म्हणाले, “लग्न झाल्यावर मी तिला स्पष्ट सांगितलं – आपल्याला गावी जावं लागेल, शेती करावी लागेल. ती मुंबईतली होती, पण माझ्या निर्णयात पूर्ण साथ दिली. भात लावणं, काढणं, मळणी – सगळ्यात माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. तिच्या मदतीमुळेच आज हे सुखाचे दिवस पाहतोय.”
भरतशेठ गोगावले यांच्या या सोज्वळ प्रेमकथेमुळे त्यांच्या कठोर राजकीय प्रतिमेमागे लपलेला एक हळवा, प्रेमळ माणूस दिसून आला. त्यांनी व्यासपीठावर पत्नी सुषमाताईंच्या साथीसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. “ती नसती तर मी इथवर आलो नसतो,” असंही त्यांनी म्हटलं.
या कार्यक्रमात गोगावले दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. आणि त्यांच्या या प्रेमळ कथेनं, उपस्थितांच्या हृदयात एक गोड ठसा उमटवला.