संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून काँग्रेस नेत्या आणि खासदार प्राणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला केवळ एक दिखाऊ नाटक असल्याचे म्हणत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“राजीनामा हा केवळ दिखावा” – प्राणिती शिंदे
प्राणिती शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपद्धतीने करण्यात आली. हा राजीनामा तत्काळ दिला गेला असता तर ते योग्य झाले असते. मात्र हे सरकार अत्यंत निर्ढावलेले आहे. त्यामुळे आता राजीनामा देणे हा केवळ दिखावा आहे.”
“मुंडेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारली नाही”
धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणे दाखवून राजीनामा दिल्याचे सांगितले. यावर शिंदे म्हणाल्या, “मुंडेंनी अद्यापही या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली नाही. या प्रकरणात त्यांचे नाव थेट आरोपी म्हणून घेतले पाहिजे. सरकारने कोणालाही पाठीशी घालू नये आणि कठोर कारवाई करावी.”
सरकारवर निशाणा
शिंदेंनी सरकारवर टीका करताना स्पष्ट केले की, “हे संपूर्ण प्रकरण सर्वांच्या समोर आहे. तरीही सरकार कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. जर योग्य न्याय मिळाला नाही, तर यासंदर्भात मोठे आंदोलन छेडले जाईल.”
सध्या या प्रकरणावरून मोठे राजकीय वातावरण तापले आहे. आता सरकार आणि प्रशासन यावर पुढे काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.