पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने तीव्र आणि ठोस प्रतिक्रिया दिली असून, या कृतीमुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भारताचे उत्तर केवळ शब्दांपुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष कृतीद्वारे पाकिस्तानला धक्का दिला गेला आहे. पाण्याच्या थेंबावरून सुरु झालेला संघर्ष आता राजनैतिक आणि लष्करी पातळीवर पोहोचला आहे.

भारत सरकारने पेहेलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंधू जल करारावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. हा करार दोन्ही देशांमध्ये 1960 पासून लागू होता. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्याचा मोठा हिस्सा अडवण्यात येणार आहे, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शेती आणि दैनंदिन जीवनावर होणार आहे. याशिवाय अटारी-वाहाघा सीमा बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे व्यापारी आणि लोकल पातळीवरील हालचाली ठप्प होतील.
राजनैतिक पातळीवरही भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध कमी करत, एक प्रकारे त्यांच्या विरोधातील कठोर पावले उचलली आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत भारत सरकारच्या या निर्णयांची माहिती दिली. त्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला असून, त्यांनी तत्काळ राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
पाकिस्तानने देखील आपल्या लष्करी तयारीला वेग दिला असून, त्यांची नेव्ही हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. त्यांना शंका आहे की भारत एखाद्या जलमार्गातून कारवाई करू शकतो. त्यामुळे 24 आणि 25 एप्रिल या दोन दिवसांसाठी समुद्र किनाऱ्यावर लाइव्ह फायरिंगचा इशारा जारी करण्यात आला आहे. कराची आणि ग्वादर परिसरात या सरावाच्या पार्श्वभूमीवर नागरी जहाजांना सुरक्षित अंतर राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याचबरोबर पाकिस्तानने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी अधिकृत नोटिफिकेशन देखील काढले आहे. पाकिस्तानच्या 20 फायटर जेट स्क्वॉड्रन्सना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी भारताकडून कोणताही ठोस पुरावा न दिल्याची तक्रार केली असून, ही एक राजकीय चाल असल्याचे म्हटले आहे. माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताकडून भविष्यात एखादा मोठा एअर स्ट्राइक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, नवाज शरीफ यांनी लंडनहून पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतला आहे. ते 25 एप्रिल रोजी होणाऱ्या आपत्कालीन बैठकीस उपस्थित राहणार असून, पीएमएल-एनच्या वरिष्ठ नेत्यांसोबतही विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
या साऱ्या घडामोडी पाहता, भारत आता कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला संयमाने न घेता कठोर पावले उचलण्याच्या धोरणावर आहे आणि पाकिस्तानला आता त्याची किंमत चुकवावी लागणार हे स्पष्ट दिसत आहे.