पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत.

मध्यरात्री केंदूर घाटात घडलेल्या या घटनेत, पोलिसांनी स्वतःचे संरक्षण करत प्रत्युत्तरादाखल दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी दरोडेखोराच्या पायाला लागली असून, त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर शहर हादरले
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात अलिकडेच घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे आधीच चिंता वाढली असताना, आता पोलिसांवर थेट हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनांमुळे पुणे हे ‘विद्येचं माहेरघर’ की ‘गुन्हेगारीचं केंद्र’ असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
बलात्कार प्रकरणात चौकशी सुरू
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तांत्रिक तपासणी दरम्यान, पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात कोणताही पूर्वीचा संपर्क नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडितेने आपला जीव वाचवण्यासाठी आरोपीला विनवणी केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी या दोन्ही घटनांची कसून चौकशी सुरू केली असून, पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी होत आहे.