मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात उद्योगजगतावर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करताना, “गुंतवणूकदारांना आमच्याच माणसांना काम द्या, आमच्याच दराने व्यवहार करा, असा दबाव टाकला जातो,” असं वक्तव्य केलं होतं. यामुळे विकासाचा वेग थांबतो, असंही त्यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं की, “दादागिरी कुणी केली हे स्पष्ट करा. पुण्यातील एमआयडीसीमध्ये दादागिरी कोणाची आहे? अजितदादांची की भाजपची की शिंदे गटाची?” त्यांनी विचारलं की, जर मुख्यमंत्रीच व्यासपीठावर असे गंभीर आरोप करत असतील, तर त्यांनी स्पष्टपणे त्या व्यक्तींची नावं जाहीर का करत नाहीत?

रोहित पवारांनी असंही नमूद केलं की, पुण्यातील तळेगाव, चाकण परिसरातील अनेक कंपन्या महाराष्ट्र सोडून जात आहेत. मोठमोठ्या गुंतवणूकदारांचे प्रकल्प गुजरातकडे वळत आहेत आणि यावर राज्य सरकार काहीच करताना दिसत नाही. फडणवीस हे सर्व माहिती असूनही कारवाई करत नसतील, तर ही भाजपची ठरवून घेतलेली भूमिका असू शकते, असा शंकेचा सूरही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वादग्रस्त विधानावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. भरणे यांनी म्हटलं होतं की, “एखादं काम वाकडं असलं, तरी त्याला नियमांत बसवून करावं लागतं.” या विधानावर रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या तिजोरीत वाकडं काम करणाऱ्यांना कृषीखातं दिलं जातंय का? आम्ही अशा वाकड्या कामांना विरोध करतो. सरळ काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी आहे. पण जर तुमच्या हातून वाकडं काम झालं, तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. आणि आम्हीही नाही.”
राज्यातील उद्योग धोरण, गुंतवणूक आणि कारभाराच्या पारदर्शकतेवरून निर्माण झालेला हा वाद आता अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी आता नावं उघड करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.