पुण्याच्या कोथरूड परिसरातील रहिवासी आणि उद्योजक लक्ष्मण साधू शिंदे यांची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक कराराच्या नावाखाली त्यांना पाटण्याला बोलवून, अपहरण करून जीव घेण्यात आला. मृतदेह बेवारस समजून अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असताना पोलिसांनी वेळेत ओळख पटवली आणि प्रकार उघडकीस आला.

व्यवसायाच्या निमित्ताने पाटण्याला गेले
११ एप्रिल रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास लक्ष्मण शिंदे इंडिगोच्या 6E-653 विमानाने पुण्याहून पाटणाकडे रवाना झाले. एका ईमेलद्वारे त्यांना स्वस्त दरात टुल्स आणि मशिनरी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी पत्नीला फोन करून गाडी आलेली असून झारखंडमधील कोल इंडिया कंपनीच्या कार्यालयात जाणार असल्याचे सांगितले.
फोन बंद आणि संशयास्पद कॉल
त्याच रात्री त्यांच्या पत्नी रत्नप्रभा यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाईल बंद होता. काही वेळानंतर मोबाईल सुरू झाला, परंतु कॉल केल्यावर एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून शिंदे बाथरूममध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी ही माहिती साडू विशाल लोखंडे यांना देण्यात आली आणि त्यांनी पुणे पोलिसांकडे अपहरणाची तक्रार दाखल केली.
मृतदेह रस्त्यावर, ओळख न झाल्यास बेवारस म्हणून अंत्यसंस्कार
१२ एप्रिल रोजी जहानाबाद जिल्ह्यातील घोषी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. ओळख पटली नसल्यामुळे पोलिसांनी तो बेवारस मृतदेह समजून अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. दरम्यान, पाटणा पोलिसांनी इतर पोलीस ठाण्यांना शिंदे यांचे फोटो पाठवले होते आणि जहानाबाद पोलिसांनी माहिती दिल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.
गळा दाबून हत्या, खंडणी मागितली असल्याचा संशय
प्राथमिक तपासानुसार, खंडणीसाठी शिंदे यांचे अपहरण करण्यात आले आणि पैसे न मिळाल्याने गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी खोटे आमिष दाखवून हा घातपात केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.