पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील हिरपोडी गावात अंधश्रद्धेच्या भयावह अघोरी प्रकाराची खळबळजनक घटना समोर आली आहे. गावातील एका राईस मिलच्या मागे असलेल्या शेतातील बाभळीच्या झाडावर माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर व इतर दोन गावकऱ्यांचे फोटो लावून, त्यावर लिंब, बिब्बे, खिळे, काळी बाहुली, तेलाच्या बाटल्या आणि हळद-कुंकू यासारख्या वस्तू ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
ही घटना सकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित गावात ही माहिती दिल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं. ग्रामस्थांनी मिळून झाडावर लावलेलं संपूर्ण साहित्य हटवून त्याची विधीवत होळी केली.

या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, याआधीही गावात अशा प्रकारच्या करणीच्या घटना घडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा प्रकार गावातीलच एखाद्या व्यक्तीनेच केला असावा, असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांनी याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. पोलिस प्रशासनानेही याची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे.
हा प्रकार समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असून, कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर त्वरित कारवाई झाली पाहिजे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात आजही अघोरी प्रकार, करणी यावर लोकांचा विश्वास असल्याने अशा घटनांचा पुनरुच्चार होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामपातळीवर जनजागृती व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे.