पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींवर झालेल्या कथित छळाच्या घटनेमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री उशिरा आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता आणि अंजली आंबेडकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात उपस्थिती लावली. यानंतर रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोलिसांवर गंभीर आरोप करत प्रश्नांची मालिका मांडली, ज्याला भाजपने रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते केशव उपाध्ये यांनी रोहित पवारांवर पलटवार करत सांगितलं की, “पुरावे नसताना अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकण्यात आला. हे झुंडशाहीचं उदाहरण असून, अशा प्रकारे पोलिसांवर दबाव टाकणं हीच शरद पवार यांची भूमिका आहे का, याचे उत्तर दिलं पाहिजे.”
उपाध्ये यांनी पुढे दावा केला की, ही 15 दिवसांतली रोहित पवार यांची दुसरी घटना आहे जिथे त्यांनी पोलीस यंत्रणेशी थेट हस्तक्षेप केला. “रात्री उशिरा आम्ही सांगतो म्हणून गुन्हा दाखल करा, ही मागणी पुराव्यांशिवाय होती,” असे ते म्हणाले.
दरम्यान, रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारलं की, एवढा संताप असूनही पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता? संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण? पोलीस नसलेले लोक चौकशीला का उपस्थित होते? आणि मुलींना जीवे मारण्याची धमकी कुणी दिली?
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस प्रशासनावर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप होत असून, जनतेत पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाला असल्याची भावना निर्माण झाली आहे.
पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पाळली की नाही, हा खरा मुद्दा असून, दोन्ही बाजूंनी सातत्याने होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनत आहे.