जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये अलीकडेच घडलेला दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे. या क्रूर हल्ल्यात २७ जणांनी प्राण गमावले असून, मृतांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. अचानक घडलेल्या या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हल्ल्यानंतर पहलगाम आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे. रस्त्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय लष्कराचे जवान तैनात असून, सर्वत्र एक तणावपूर्ण वातावरण पसरले आहे.
या घटनेच्या वेळी महाराष्ट्रातील हरिश सोलिया आपल्या काही ज्येष्ठ नातेवाईकांसह पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी या थरारक प्रसंगाचा अनुभव सांगताना टीव्ही९ मराठीशी संवाद साधला. सोलिया म्हणाले, “पहलगाममधील ‘आइस लेन’ हा बर्फाच्छादित परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. हल्ल्याच्या वेळी आम्हीही त्या भागात होतो. मात्र, आम्ही वर जाण्याऐवजी खालीच थांबलो होतो, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. गोळीबार प्रामुख्याने वरच्या भागात झाला.”
हल्ल्यानंतर काही मिनिटांतच सुरक्षा दलांनी परिसराला घेरले. जम्मू-काश्मीर पोलिसांसह सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले. चंदनवाडी ते पहलगामदरम्यान सुमारे ३० किलोमीटरच्या पट्ट्यात सर्व दुकाने बंद करण्यात आली. हरिश सोलिया यांनी सांगितले की, “गोळीबार सुरू होताच रुग्णवाहिकांचा आवाज कानठळ्या बसवणारा होता. एकामागून एक अॅम्ब्युलन्स धावत होत्या, आणि लष्कराच्या गाड्याही मोठ्या संख्येने पोहोचल्या.”
मिळालेल्या माहितीनुसार, या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय चार जण जखमी झाले आहेत, ज्यापैकी माणिक पाटील आणि एस. भालचंद्र हे दोघे पुण्याचे असल्याचे समजते. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. गृहमंत्री अमित शहा यांनीही तातडीने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.
सध्या संपूर्ण देशात या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध होत आहे. या घटनेमुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहलगाम आणि आजूबाजूच्या भागात कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्यात येत आहेत.