परळीमध्ये आज भाजप आमदार सुरेश धस यांच्या दौऱ्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी त्यांच्या गाडीला अडवले, त्यांना काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी दगड उचलल्याचेही समोर आले आहे.

आंदोलकांचा संताप का?
आंदोलकांनी सुरेश धस यांच्यावर परळीच्या बदनामीचा आरोप केला असून, त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शिरसाळा गावात धस यांच्या विरोधात निदर्शने झाली. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सुरेश धस यांची प्रतिक्रिया
या घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश धस म्हणाले, “लोकशाहीत काळे झेंडे दाखवण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, पण पोलिसांसमोर दगड उचलण्याचा प्रकार चुकीचा आहे. हे कुणाच्या इशाऱ्यावर चाललंय, हे स्पष्ट आहे.”
पुढे ते म्हणाले, “मी पाच वेळा आमदार राहिलो आहे, राज्यमंत्रीही होतो. तरी माझ्या गाडीसमोर असे प्रकार होत आहेत. ही गुंडगिरी थांबवण्यासाठीच मी राजकारणात आलो आहे. निषेध करणारे लोक शासकीय जमिनींवर अतिक्रमण करणारे किंवा बेकायदेशीर वीटभट्टी चालवणारे असावेत.”
धनंजय मुंडे यांच्याशी भेट आणि मराठा आरक्षण मुद्दा
धस यांनी अलीकडेच मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलने करणारे मनोज जरांगे पाटील यावर सातत्याने टीका करत आहेत. मात्र, यावर धस यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. “मनोज जरांगे पाटील आमचे दैवत आहेत, त्यांच्यावर मी काहीही बोलणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.