भारतीय लष्कराने नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी माहिती देण्यासाठी रविवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून या कारवाईचा तपशील पुराव्यानिशी समोर ठेवण्यात आला. चार दिवस चाललेल्या या ऑपरेशनमुळे सीमापार लपलेल्या दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून भारताने स्पष्ट संदेश दिला. मात्र या पत्रकार परिषदेच्या प्रारंभाने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं – कारण सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये वाजणारी ‘शिव तांडव स्तोत्र’ची धून.

ही धून ऐकून अनेकांच्या अंगावर शहारा आला, आणि सोशल मीडियावर या क्षणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत या व्हिडीओच्या पार्श्वसंगीताची जोरदार दाद दिली. अनेकांनी लिहिलं, “दहशतवाद्यांना हे उत्तर पुरेसं आहे” तर काहींनी म्हटलं की “धून इतकी प्रभावी होती की ती अजूनही कानात घुमते आहे.”
शिव तांडव स्तोत्र हे भगवान शंकराला समर्पित एक अद्वितीय स्तोत्र आहे. पुराणकथेनुसार, रावणाने आपल्या गर्वातून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भगवान शिवाने केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वत खाली दाबून रावणाला अडवले. यातून सुटण्यासाठी असह्य वेदनेत असतानाही रावणाने शिवाची स्तुती करत हे स्तोत्र रचले. त्याच्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन शिवाने त्याला क्षमा केली, आणि हे स्तोत्र ‘शिव तांडव’ या नावाने प्रसिद्ध झालं.
या स्तोत्राच्या धूनचा वापर लष्करी कारवाईच्या व्हिडीओमध्ये करण्यात आल्यामुळे त्याला एक वेगळं तेज, ताकद आणि भावनिक वजन मिळालं. ही धून केवळ पार्श्वसंगीत नव्हती, तर ती एक प्रकारचं मानसिक शस्त्र होती – जी देशवासीयांमध्ये आत्मविश्वास आणि अभिमान जागवणारी होती.
पत्रकार परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत सुमारे 100 दहशतवादी आणि पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार करण्यात आले. ही कारवाई भारताच्या संयमाचं नाही, तर क्षमतांचं उदाहरण असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यापुढे अशा प्रकारच्या आगळिकांवर आणखी कठोर आणि परिणामकारक प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
एकूणच, ‘ऑपरेशन सिंदूर’चं सामरिक महत्त्व जितकं आहे, तितकंच भावनिक बळ देणारी सुरुवात देखील जनतेच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहणारी ठरली आहे.