22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आणि यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव शिगेला पोहोचला. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत 7 मे रोजी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर भारताने आणखी एक मोठा पाऊल उचलले – 10 मे रोजी पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर थेट हवाई हल्ला केला.

हा हल्ला केवळ लष्करी कारवाई नव्हता, तर एका रणनीतीचा भाग होता. नूर खान एअरबेस हे पाकिस्तानच्या रावळपिंडी परिसरात स्थित असून, तेथून पाकिस्तानचे महत्त्वाचे लढाऊ विमान ऑपरेशन्स, दुरुस्ती केंद्रे आणि व्हीव्हीआयपी उड्डाणे नियंत्रित केली जातात. तसेच, हे स्थान पाकिस्तानच्या अणू शस्त्र कमांड स्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्र सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, नूर खानवरचा हल्ला हा पाकिस्तानसाठी एक गंभीर इशारा होता. भारताने अणू युद्धाचा धोका ओळखून पाकिस्तानचे न्यूक्लिअर कमांड सेंटर हे पुढचे लक्ष्य ठरवले होते. हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तत्काळ अमेरिका सरकारशी संपर्क साधल्याची माहिती पुढे आली आहे.
10 मे रोजी झालेल्या या कारवाईमध्ये भारताने नूर खानसह चकवालच्या मुरीद आणि शोरकोटच्या रफीकी एअरबेसवरही लक्ष्यभेदी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. हे क्षेपणास्त्र इतक्या अचूकतेने मारले गेले की पाकिस्तान त्याचे ट्रॅकिंगही करू शकला नाही. त्यामुळे नूर खान एअरबेसवरील महत्त्वाच्या संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या.