शिवसेना (उबाठा) पक्षाचं विभागीय शिबिर येत्या १६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. संध्याकाळी ६.३० वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिबिरात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून, शिबिराचे उद्घाटन युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

या खास शिबिरात एक अनोखी गोष्ट घडणार आहे – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आजवर न ऐकलेले भाषण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऐकवले जाणार आहे. ही माहिती शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी दिली. त्यांच्या मते, हे भाषण ऐकवताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, उपस्थितांना इतिहासाच्या एका जिवंत क्षणाचा अनुभव मिळेल.
शिबिरात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे हे देखील सहभागी होणार आहेत. संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, सरोदे यांनी शिवसेना उबाठाला अनेक वेळा कायदेशीर मार्गदर्शन करून साथ दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर राऊतांचा निशाणा
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या अलीकडील टीकेवर प्रत्युत्तर देताना, संजय राऊत यांनी त्यांना अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुख तुळशी गबार्ड यांचे निवेदन वाचण्याचा सल्ला दिला. त्यांनी नमूद केलं की, आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी कोणाच्या पायावर लोटांगण घालण्याची गरज नाही. आजवर आम्ही सत्ता मिळवण्यासाठी कधीही स्वाभिमान गमावलेला नाही, असं ते म्हणाले.
राऊतांनी भाजपच्या सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना सांगितलं की, शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना औरंगजेबच्या कबरीला ‘समाधी’चा दर्जा दिला, जी गोष्ट आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. अशा मंडळींशी सत्ता वाटून घेणं शक्य नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना राऊत म्हणाले की, ते अनेक वाद मिटवण्यात कुशल आहेत – मग तो औरंगजेबचा वाद असो किंवा मराठा समाजाचं आंदोलन. परंतु महात्मा फुले यांच्यावर आधारित एका चित्रपटाला काही ब्राह्मण संघटनांकडून विरोध केला जात आहे, यावर फडणवीस अजूनही गप्प का आहेत? हा चित्रपट महाराष्ट्र सरकारच्याच साहित्यात दिलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, असं राऊत यांनी सांगितलं.