नुकतेच कृषी खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे एका व्हिडीओमुळे चर्चेत आले होते. विधिमंडळात रमी खेळल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी दबाव टाकत राजीनाम्याची मागणी केली होती. परिणामी, त्यांची खात्यांमध्ये बदली करून क्रीडा व युवक कल्याण विभाग देण्यात आला. आता त्यांच्याच पाठोपाठ दुसरे नाशिकचे मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळही वादात अडकले आहेत.

राज्यात झिरवाळ यांच्या निर्णयामुळे अन्न व औषध प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. कारण, झिरवाळ यांनी कोणतेही स्पष्ट कारण न देता तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले. या निर्णयाने नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई अपमानास्पद असल्याचे सांगितले असून, निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
प्रकरण नंदुरबार जिल्ह्यातील आहे. 10 मार्च रोजी अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार यांनी अक्कलकुवा येथील महेश आणि रमेश तंवर यांच्या दुकानात छापा टाकून रिफाइन्ड तेलाचे नमुने घेतले. नमुने छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आणि अहवालात अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर दुकानदाराला माहिती देण्यात आली आणि 4 जून रोजी नमुने फेरतपासणीसाठी म्हैसूर येथे पाठवण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, झिरवाळ यांनी विधानसभेत नाशिक विभागाचे सहआयुक्त महेश चौधरी आणि नंदुरबारचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे व आनंद पवार यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. ही कारवाई आमदार आमशा पाडवी यांच्या प्रश्नावर आधारित असल्याचे सांगण्यात येते.
मात्र अधिकाऱ्यांनी या निर्णयाचा तीव्र विरोध करत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांचा आरोप आहे की कारवाई घाईत व अन्यायकारक होती. झिरवाळ यांचा यावर प्रतिसाद असा की, अधिकारी वेळेवर कारवाई करत नव्हते, म्हणूनच कठोर निर्णय घेण्यात आला.