संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दीड ते दोन महिन्यांनी महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, या प्रसंगी केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी विचारले होते की, “देशमुखांची हत्या मारेकऱ्यांनी का केली? माध्यमांनी मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही?”

या विधानामुळे त्यांच्यावर तीव्र टीका झाली. यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, “काही वेळा अजाणतेपणाने वक्तव्ये केली जातात. माझं सुरुवातीचं वक्तव्यही असंच होतं.”
सुधारित भूमिका आणि मागे घेतलेलं विधान
शास्त्री पुढे म्हणाले की, “जेव्हा धनंजय देशमुख कुटुंब भगवानगडावर आलं, तेव्हा त्यांनी मला संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. त्यानंतर मला या प्रकरणाची खरी जाणीव झाली आणि अंतःकरण हेलावलं. मी न्यायालयाला विनंती करतो की आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. कोणत्याही हत्येचं समर्थन करता येत नाही.”
त्यांनी भगवानगड पीडित कुटुंबाच्या पाठिशी उभे राहण्याचाही शब्द दिला.
वादग्रस्त वक्तव्यावर खुलासा
शास्त्रींनी स्पष्ट केले की, “घटनेची संपूर्ण माहिती नव्हती म्हणून असं वक्तव्य केलं गेलं. मात्र, सत्य कळल्यानंतर माझी भूमिका बदलली. अजाणतेपणामुळे मी असं बोललो.”
त्यांच्या सुरुवातीच्या वक्तव्यावरुन मोठी टीका झाली असली, तरी त्यांनी नंतर घेतलेल्या यु-टर्नमुळे हा वाद काहीसा शांत होण्याची शक्यता आहे.