मुंबई – नागरी प्रशासन आणि लष्करी यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह लष्कर, नौदल आणि वायूदलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नागरी आणि लष्करी यंत्रणांमध्ये अधिक परिणामकारक समन्वय कसा साधता येईल, यावर सखोल चर्चा झाली. यामध्ये गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि सायबर सुरक्षेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी यावर विशेष भर देण्यात आला. याशिवाय, राज्य सरकार आणि संरक्षण दलांमधील सहकार्य आणखी गतिमान करण्यासाठी काय पावले उचलता येतील, याचाही विचार करण्यात आला.
या बैठकीत लष्कराच्या वतीने लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा आणि कर्नल संदीप सील यांनी प्रतिनिधित्व केले. नौदलातून रियर अॅडमिरल अनिल जग्गी आणि कमांडर नितेश गर्ग सहभागी झाले, तर वायूदलाचे प्रतिनिधित्व एअर वाईस मार्शल रजत मोहन यांनी केले. तसेच, राज्य सुरक्षा यंत्रणांतील एटीएस आणि होमगार्डचे प्रतिनिधी, तसेच रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’चा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, हे ऑपरेशन अत्यंत अचूकपणे आणि प्रभावीपणे पार पाडण्यात आले असून, भारतीय लष्कराने दाखवलेली शौर्य आणि संयमास मी सलाम करतो. त्यांनी यावेळी मुंबईचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ही शहर देशाची आर्थिक राजधानी आहे, आणि त्यामुळे ती शत्रूंकरवी नेहमीच लक्ष्य बनते. त्यामुळे गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण आणि सायबर सुरक्षेच्या बाबतीत अधिक दक्षता आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
फडणवीस यांनी अधिक स्पष्ट करत सांगितले की, आगामी काळात नागरी आणि लष्करी यंत्रणांनी एकत्र येऊन अधिक परिणामकारकपणे कार्य करणे गरजेचे आहे. त्यांनी राज्य शासनाकडून संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आणि समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
गेल्या 7 मे रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई कारवाई केली होती. या कारवाईत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. यानंतर सुरक्षेबाबत राज्य शासन अधिक सजग झाल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.